महत्त्वाचेशहर

कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर थेऊर फाटा येथे कडक पोलिस बंदोबस्त


लोणी काळभोर (पुणे) : शौर्य दिनानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत थेऊर फाटा परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. थेऊर ते विजय स्तंभ या मार्गावर संपूर्णपणे नाकाबंदी, वाहन तपासणी आणि सततची गस्त सुरू असून, परिसराला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

या बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त (डीसीपी) मिलिंद मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या थेट नियंत्रणाखाली वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात आहेत. बंदोबस्तात सहायक पोलीस आयुक्त होनमाने साहेब, पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकले, लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विकास जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस उपनिरीक्षक संतोष घावटे, पोलीस हवालदार रवी आहेर, पो. कॉ. चव्हाण, पो. कॉ. सय्यद, पो. कॉ. पुंडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी व होमगार्ड कर्मचारी सहभागी आहेत.

या बंदोबस्तात दिवसा एक पोलीस निरीक्षक व १६ पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले असून, १२ तासांच्या शिफ्टमध्ये सलग बंदोबस्त सुरू आहे. थेऊर फाटा परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत असून, संशयित व्यक्तींची झडती, वाहन कागदपत्रांची पडताळणी तसेच गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. सीसीटीव्ही निरीक्षणासह गस्ती पथकांमार्फत परिसरावर सतत नजर ठेवली जात आहे.

हा बंदोबस्त २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत कायम राहणार असून, शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अफवा, अनुचित हालचाल किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तत्काळ व कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत.

थेऊर फाटा परिसरात पोलिसांची नाकाबंदी, तपासणी आणि मोठ्या प्रमाणावर असलेला बंदोबस्त पाहता शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा स्पष्ट इशारा मानला जात आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, नियमांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शौर्य दिन शांततेत, शिस्तबद्ध वातावरणात आणि सुरक्षिततेत पार पडावा, यासाठी लोणी काळभोर पोलीस प्रशासन पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरले असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *